वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान; शेतकरीपुत्र खा.सोनवणेंनी संसदेत मांडला प्रश्न हरीण, रानडुकरांनी नुकसान केल्यास भरपाई का नाही?, शेतकऱ्यांच्या आवाज दिल्लीत पोहचविला

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान; शेतकरीपुत्र खा.सोनवणेंनी संसदेत मांडला प्रश्न

 

हरीण, रानडुकरांनी नुकसान केल्यास भरपाई का नाही?, शेतकऱ्यांच्या आवाज दिल्लीत पोहचविला

 

बीड: बीड जिल्ह्यात हरीण, रानडुक्करे व इतर वन्य प्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होत आहे. नैसर्गिक आपत्ती सोबतच जंगली प्राणी उपद्रवामुळे शेतीमालाचे नुकसान बीड जिल्ह्यातील कांही भागात मोठ्या प्रमाणात होत असते. ही चिंतेची बाब आहे. हा उपद्रव रोकण्यासाठी उपाय योजना करण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांना पिकांची नुकसान भरपाई मिळत नाही. इतर राज्यांमधे हत्तीने पिकाचे नुकसान केले तर भरपाई मिळते, पण आमच्या शेतकऱ्यांना हरीण, रानडुक्कर यांनी नुकसान केल्यानंतर नुकसान भरपाई का मिळत नाही?, असा सवाल उपस्थित करत वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी तसेच हा उपद्रव रोकण्यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात,अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी संसदेत केली. जिल्ह्यातील शेतकरीपुत्र म्हणून खा.सोनवणे यांची ओळख असून ते वारंवार शेती प्रश्नावर आवाज उठवित आहेत.

 

कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकुर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे, पंतप्रधान पीक विमा योजनेत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस संरक्षण मिळते तसेच शेतीला कुंपण घालण्यासाठी राज्य सरकारे उपाययोजना करतात मात्र, जंगली प्राण्यांमुळे होणारे नुकसान हे टाळता येण्यासारखे असल्याने आधी या योजनेत त्याचा समावेश नव्हता. पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय तसेच विविध राज्य सरकारांच्या विनंतीनंतर, राज्य सरकारांना या नुकसानीचा ‘ॲड-ऑन कव्हर’ स्वरूपात समावेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि, महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत हा पर्याय लागू केलेला नाही. तसेच, केंद्र सरकारकडून ‘डेव्हलपमेंट ऑफ वाइल्डलाईफ हॅबिटॅट्स’, ‘प्रोजेक्ट टायगर’ आणि ‘प्रोजेक्ट एलिफंट’ या योजनांतर्गत राज्यांना आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये काटेरी तारांचे कुंपण, सोलार ऊर्जेवर चालणारे कुंपण, कॅक्टसची जिवंत फेन्सिंग, भिंती इत्यादींची उभारणी करून पिकांमध्ये जंगली प्राण्यांची घुसखोरी रोखण्याच्या उपायांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात हरीण, रानडुकरांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना वन्यप्राण्याने केलेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, शिवाय पिक वाचविण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी खा.सोनवणे यांनी केली आहे.

००

अशा आहेत महत्वाच्या मागण्या

 

1. महाराष्ट्रात पंतप्रधान पीक विमा योजनेच्या ॲड-ऑन कव्हरमध्ये हरिण व रानडुकरांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचा समावेश करण्यास तात्काळ मान्यता द्यावी.

2. हा पर्याय लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याबाबत योग्य ती माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून ते वेळेत या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

3. तसेच, केंद्र व राज्य योजनांद्वारे उपलब्ध असलेल्या सोलार किंवा तारांचे कुंपण, भिंत बांधकाम इत्यादी प्रतिबंधात्मक उपायांनाही अधिक बळकटी द्यावी.

००

मुख्यमंत्र्यांकडेही केली मागणी

 

केंद्रशासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आवश्यक ती आर्थिक सुरक्षा मिळेल आणि शेतीसंबंधी टाळता येणाऱ्या धोका घटकांपासून संरक्षण मिळेल, मात्र महाराष्ट्र राज्यातील सर्वदूर भागामधे रानडुक्कर, हरिणे तसेच इतर जंगली प्राणी याचा शेतास होत असलेल्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ॲड-ऑन कव्हरमधे रानडुक्करे, हरिणे व इतर जंगली प्राण्यांमुळे होत असलेल्या नुकसानीचा समावेश करावा व अशा भागामधे शेतीला कुंपण घालून हा उपद्रव रोकण्यासाठी उपाययोजना करव्यात यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना खा.बजरंग सोनवणे यांनी पत्र देऊन मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!