केज एसटी आगाराचा प्रश्न मार्गी लागणार ! तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश  शेषराव घोरपडे, नासेर मुंडे, दिलीप सपाटे यांनी घेतली भेट

केज एसटी आगाराचा

प्रश्न मार्गी लागणार !

तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

शेषराव घोरपडे, नासेर मुंडे, दिलीप सपाटे यांनी घेतली भेट

मुंबई : प्रतिनिधी

केज शहर सध्या खामगाव-पंढरपूर व अहमदपूर-अहमदनगर महामार्गाच्या जोडणीवर आहे. येथून दररोज हजारो प्रवाशी बसगाडीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात.

केज येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे आगार व्हावे या मागणीसाठी गेली अनेक वर्षांपासून सातत्याने आंदोलन आणि पाठपुरावा करणाऱ्या केज विकास संघर्ष समितीच्या या मागणीला आता यश येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समितीच्या वतीने राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले असता त्यांनी एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. लवकरच केज येथील सात एकर जागेवर सुसज्ज असे एसटी आगार तयार करून केज तालुका वासियांचे स्वप्न साकार केले जाईल, असे आश्वासन प्रताप सरनाईक यांनी दिले आणि या मागणीसाठी आपल्या वयाची तमा न बाळगता निस्वार्थी भावनेने सातत्याने आंदोलन आणि पाठपुरावा करणाऱ्या शेषराव घोरपडे आणि नासेर मुंडे यांचे कौतुक केले.

केज येथे एसटी आगार उभारण्यासाठी ७ एकर १३ गुंठे जागा आरक्षित करण्यात आली असली तरी या जागेवर आगार काही उभे राहिले नाही. बाजूच्या धारूर, आंबेजोगाई, कळंब, पाटोदा अशा सर्व तालुक्यांमध्ये एसटी आगार असताना केज तालुक्यावर आणि तालुक्यातील प्रवाशांवर अन्याय सुरू आहे. हे आगार उभे रहावे म्हणून एसटीचे निवृत्त कर्मचारी असलेले शेषराव घोरपडे सातत्याने उपोषणे आणि आंदोलने करत आले आहेत. केज विकास संघर्ष समितीचे हनुमंत भोसले, नासेर मुंडे, रामहरी कोल्हे आदींनी त्यांच्या प्रयत्नांना साथ दिली आहे. परंतु, प्रशासनाने वेळोवेळी आश्वासने दिली असली तरी अद्याप कार्यवाही केलेली नाही.

गुरुवारी केज विकास संघर्ष समितीचे शेषराव घोरपडे, नासेर मुंडे आणि केजचे भूमिपुत्र असलेले मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत या विषयावर निवेदन सादर करीत सविस्तर चर्चा केली. केज तालुक्याची चार लाखाहून अधिक लोकसंख्या असतानाही या ठिकाणी एसटी आगार तयार करण्यात आलेले नाही. डेपो नसल्यामुळे केज तालुक्यातील जनतेला प्रवास करताना हाल सहन करावे लागत आहेत. लांब पल्ल्याच्या कोणत्याही गाड्या केस मधून सुटत नाहीत. त्या अन्य तालुक्यातून भरून येतात. त्यामुळे केज तालुक्यातील जनतेला लोंबकळत प्रवास करावा लागतो. केज तालुक्याच्या ग्रामीण भागातही म्हणावी तशी एसटी वाहतूक होत नाही. गेली काही वर्ष आगारासाठी मोक्याच्या ठिकाणी भूखंड असतानाही त्याचा वापर एसटी महामंडळाकडून केला जात नाही. राज्य सरकारने आतातरी आगार उभारून केस तालुक्यातील जनतेचा त्रास कमी करावा अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे करण्यात आलयाची माहिती हनुमंत भोसले यांनी दिली.

यावर सरनाईक यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून अद्याप आगार का होऊ शकले नाही. जागा असताना तिचा वापर का केला नाही, याची माहिती घेतली. तसेच या आगाराचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय सेठी यांना दिले. त्यानंतर या शिष्टमंडळाला मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पाठवून सरनाईक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली. त्यांच्या निर्देशानुसार अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन मुख्यालयातील या बैठकीत अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी आम्ही वयोवृद्ध व्यक्ती केज मधील एसटी आगार या सार्वजनिक बाबींसाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. परिवहन मंत्र्यांनी आमच्या मागणीची तातडीने दखल घेतली आणि कार्यवाही करण्याचे निर्देश दिले त्याबद्दल केज विकास संघर्ष समितीच्या वतीने हनुमंत भोसले, शेषराव घोरपडे आणि नासेर मुंडे यांनी सरनाईक यांचे आभार मानले. तसेच केज तालुक्याच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील पुढे यावे, असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!