*नांदुरघाट परिसरात अवकाळीचा कहर; गदळेवाडी येथे वीज पडून गाईचा मृत्यू*
========================================================
केज/ प्रतिनिधी
कडक उन्हाळ्यात अवकाळीने केज तालुक्यात कहर केला असुन काल सोमवार रोजी अचानक आलेल्या तुफान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने नांदूरघाट परिसरात मोठे नुकसान झाले असून गदळेवाडी येथे एका शेतकऱ्याची दारात बांधलेली गायीवर मात्र विज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असुन हा पाऊस म्हणजे अवकाळी मानला जातो. या अवकाळीच्या पावसामुळे व वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे वृत्त आहे. त्यातच काल दिनांक १२ मे सोमवार रोजी दुपारी २:०० वाजता अचानक आकाशात ढग भरून आले. त्याबरोबरच सोसाट्याचे वारे सुटले. या वाऱ्याबरोबरच ढगात विजांचा गडगडाट सुरू झाला. शेतात कामासाठी गेलेले शेतकरी शेतमजूर यांची धावाधाव सुरू झाली. वातावरण पुर्ण बदलले सुसाट वारे सुटले व भर दुपारी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. पाऊस कमी परंतु वादळ आणि विज यांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होता. यावेळी मोठमोठे झाडे उन्मळून पडली. तसेच बहुतांश घरावरील पत्रे देखील उडून गेली. आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांनी शेतात गोळा केलेला कडबा हवेत उडून गेला. नांदुरघाट व परिसरात अवकाळीने मोठा तडाखा दिला. यावेळी नांदूर पासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गदळेवाडी येथील शेतकरी महादेव जालिंदर गदळे यांची गोठ्याच्या दारात बांधलेली गाय त्या गायीवर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी मात्र या मृत्यू झालेल्या गायीचे मालक या शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला यावेळी डॉक्टर यांनी तपासणी करून गाईचे पोस्टमार्टम करून या बाबतचा रिपोर्ट वरिष्ठांकडे पाठवला आहे. दावणीला लक्ष्मी असणारी गावरान गाय कालच्या अवकाळीची बळी ठरल्याने या शेतकऱ्यांनी मात्र हंबरडा फोडला या शेतकऱ्याला आता आधाराची गरज आहे. यावेळी परिसरात शेतातील उन्हाळी पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे . या घटनेचे तहसीलदार यांनी तलाठी यांना आदेश देऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. व सदरील घटनेची नुकसान भरपाई मिळवून यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
———–चौकट———
*नांदुरघाट परिसरात वीज कोसळली तसेच वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर केज तालुका व बीड जिल्ह्यात वादळी वारा व पाऊस यामुळे बऱ्याच ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तसेच जनावरांची जीवित हानी झाली आहे.त्या ठिकाणी तात्काळ पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना मदत रुपी शासनाकडून आधार देण्याचे काम संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ करावे. त्या अनुषंगाने पत्र देऊन तात्काळ पंचनामे करावेत असे देखील सूचना करण्यात येतील.—-खा. बजरंग सोनवणे*








Leave a Reply