सरपंच पतीचा पंचायत समितीत आत्मदहन करण्याचा प्रयत्न !

सरपंच पतीचा पंचायत समितीत आत्मदहन करण्याचा प्रयत्न !

(केज पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराला सरपंच वैतागले)

केज/ प्रतिनिधी.

केज. तालुक्यातील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचे शोषखड्डे व सार्वजनिक शौचालय बांधकाम या कामांची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन बिल काढण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिला सरपंचाकडे ५० हजार रुपयेची मागणी केली. त्या पैकी त्यांना २० हजार रु. देऊनही ३० हजार रु. न दिल्यामुळे त्यांनी बिल काढले नसल्याने व्यथित होऊन संतप्त झालेल्या सरपंच पतीने केज पंचायत समितीमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला. केज तालुक्यातील डोका येथील महिला सरपंच कमल गोरख भांगे यांनी गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी नियोजन यासाठी आणि सार्वजनिक शौचालय याची कामे केलेली आहेत. सर्व कामे पूर्ण होऊन देखील त्याची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन त्यांच्या बिलासाठी त्यांनी वारंवार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे कागद- पत्रांनिशी मागणी केली. परंतु ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता आंधळे, कनिष्ठ अभियंता चव्हाण आणि शाखा अभियंता वंदना साळवे या दोघांनी सरपंच पती गोरख भांगे यांच्याकडे ५० हजार रु. ची मागणी केली.गोरख भांगे यांनी कार्यकारी अभियंता आंधळे यांना त्यापैकी २० हजार रुपये त्यांना नगदी दिले. मात्र अद्यापही त्यांचे बिल निघाले नाही. त्या बाबत त्यांनी चौकशी केली असता उर्वरित ३० हजार रुपये जो पर्यंत देणार नाहीत; तो पर्यंत मोजमाप पुस्तिकेत नोंदी घेऊन बिल मिळणार नाही. अशी अरेरावीची व मग्रुरीची भाषा कनिष्ठ अभियंता चव्हाण आणि शाखा अभियंता साळवे यांनी सरपंच पती गोरख भांगे यांना वापरली. तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या सरपंच पती गोरख भांगे यांनी दि. २० मार्च रोजी दुपारी ४:०० वा. च्या सुमारास केज पंचायत समितीच्या इमारतीमध्ये आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरडाओरड आणि आत्मदहनाची माहिती मिळताच प्रभारी गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने काळे यांनी केज पोलिसांना फोन करून त्यांना पाचारण केले. पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड आणि त्यांचे पोलीस नाईक शिवाजी कागदे यांनी सरपंच पती गोरख भांगे यांच्या हातातील काडेपेटी खेचून घेत त्यांना आत्मदहन करण्या पासून रोखले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!