*होलिका दहन 2 मार्च रोजी आणि 3 मार्च रोजी चंद्रग्रहणाच्या दिवशी धूलिवंदन*
केज प्रतिनिधी.
यावर्षी 2 मार्च 2026 रोजी सोमवारी भद्रा असताना देखील सूर्यास्तानंतर प्रदोषकाळात होलिकादहन करावे. दुसरे दिवशी 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असून दुपारी 3:20 वाजता ग्रहण सुरु होत आहे, मात्र भारतात कोठेही या ग्रहणाचा आरंभ आणि मध्य दिसणार नाही. भारतात सर्वत्र हे ग्रहण ग्रस्तोदित स्वरुपाचे असणार आहे. (म्हणजेच ग्रहण लागलेले चंद्रबिंब उदयास येईल) सायंकाळी 6:48 वाजता ग्रहण मोक्ष होणार आहे, म्हणजेच ग्रहण संपेल.
मंगळवारी सूर्योदयापासून वेधकाळ सुरु होत आहे. आजारी व्यक्ती, गर्भवती स्त्रीया, लहान मुले, म्हातारी माणसे यांनी सकाळी 11 पासून वेध पाळावेत. वेधकाळात पौर्णिमेचा कुळधर्म, पूजा-अर्चा, अभिषेक करता येईल. देवाला नैवेद्य दाखविता येईल. वेधामध्ये पूजन निषेध नाही. आपणास भोजन निषेध असल्याने नैवेद्य अगदी थोडा करावा. आपण प्रसाद म्हणून अभिषेकाचे तीर्थ घेऊ शकता किंवा एक घास अन्नाचा फक्त वास घेऊ शकता. गुरुजी किंवा सुवासिनी यांना कोरडा शिधा व दक्षिणा देऊन कुळधर्म करता येईल. तसेच श्राद्ध देखील सपिंडक करता येईल, त्यावेळेस देखील श्राद्धाचा स्वयंपाक नैवेद्यापुरता करून नंतर तो गाईला द्यावा. ब्राह्मणास शिधा व दक्षिणा देणे. अशा प्रकारची कर्मे करता येत असल्याने 3 मार्च रोजी वेधकाळात धूलिवंदन (धुळवड), रंग खेळणे हे देखील करता येईल. आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून सायंकाळी 6:48 पर्यंत ग्रहणाचा पर्वकाल आहे. काही ठिकाणी अगदी थोडावेळ पर्वकाल असल्याने त्यांनी 6:48 नंतर फक्त मोक्षस्नान करावे. ज्यांना 15-20 मिनिटांपेक्षा अधिक पर्वकाळ मिळत आहे, त्यांना सूर्यास्तानंतर स्नान करून थोडावेळ जप करून 6:48 नंतर मोक्षस्नान करता येईल. त्यानंतर भोजन करता येईल.
ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन, तुला, वृश्चिक, मीन या राशींना या ग्रहणाचे शुभफल मिळेल. मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना ग्रहणाचे मिश्रफल मिळेल. वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना ग्रहणाचे अनिष्ट फल मिळेल.








Leave a Reply