राज्यात कोरडा दुष्काळ तात्काळ जाहीर करा— रजनीताई पाटील

राज्यात कोरडा दुष्काळ तात्काळ जाहीर करा— रजनीताई पाटील

 

 

शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा,अनुदान द्या

 

 

केज दि ८(प्रतिनिधी)

राज्यातील अनेक भागांत पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. पावसाअभावी पिके पूर्णपणे करपून गेली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्य सरकारने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा काँग्रेसच्या हिमाचल प्रदेशच्या प्रभारी रजनीताई अशोकराव पाटील यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने सोयाबीन, कापूस, तूर, बाजरी यांसह विविध खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पेरणी केली; मात्र पिकांच्या वाढीच्या काळात आवश्यक पाऊस न झाल्याने संपूर्ण पिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन येण्याची शक्यता मावळली असून त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने पीकविमा, दुष्काळी अनुदान आणि इतर शासकीय मदत तात्काळ वितरित करावी, अशी मागणी रजनीताई पाटील यांनी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पंचनामे करण्याच्या प्रक्रियेत वेळ जाऊ नये. पिकांची परिस्थिती स्पष्टपणे दिसत असताना पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीकविम्याची रक्कम, वीजबिलात सवलत आणि कर्जवसुलीस स्थगिती देण्याची गरज आहे. शासनाने प्रशासनाला तातडीने निर्देश देऊन प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.

“शेतकरी आज अत्यंत अडचणीत आहे. करपलेली पिके आणि शेतकऱ्यांची अवस्था पाहता कागदी प्रक्रिया न करता शासनाने तातडीने निर्णय घेऊन सरसकट मदत द्यावी. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा,” असे रजनीताई पाटील यांनी म्हटले आहे.

 

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!