श्रीक्षेत्र संतकृपा हनुमानगड येथे श्रीरामनवमी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
आष्टी प्रतिनिधी –
श्रीक्षेत्र संतकृपा हनुमानगड, सावरगाव (घाट) येथे श्रीरामनवमी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद्भागवत कथा महायज्ञ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व विविध धार्मिक, आध्यात्मिक उपक्रमांनी परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.
या महोत्सवाची सुरुवात दिनांक १९ मार्चपासून होणार असून, २७ मार्चपर्यंत विविध कीर्तन, प्रवचन, भजन, श्रीमद् भागवत कथा आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार आपली सेवा देणार आहेत. यामध्ये श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते महंत अभिमन्यू महाराज शास्त्री यांची सुश्राव्य कथा संपन्न होणार आहे, कीर्तनकार ह.भ.प. परमेश्वर महाराज जायभाये, ह.भ.प. रोहिदास महाराज शास्त्री, ह.भ.प. सोपान महाराज शास्त्री सानप, ह.भ.प. शांतीगिरी महाराज चितळकर, ह.भ.प. माऊली महाराज कोडुळे, ह.भ.प. काशिनाथ महाराज शास्त्री, ह.भ.प. कीर्तनकेसरी गहिनीनाथ महाराज खेडकर, ह.भ.प. युवाकीर्तनकार ज्ञानेश्वर म. भवर तसेच ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचा समावेश आहे.
दररोज सकाळी काकडा आरती, हरिनाम सप्ताह, धार्मिक विधी, तसेच सायंकाळी कीर्तन, प्रवचन व जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर, संत-महंत, कीर्तनकार, सामाजिक व राजकीय व्यक्तींची उपस्थिती या सोहळ्यास लाभणार आहे.
कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी म्हणजे २७ मार्च रोजी महंत श्री अभिमन्यु महाराज शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महंत अभिमन्यू महाराज शास्त्री (श्री क्षेत्र हनुमानगड) यांनी केले आहे.








Leave a Reply