ह. भ. प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचा वारकरी पुरस्काराने सन्मान.

ह. भ. प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचा वारकरी पुरस्काराने सन्मान.

केज दि १४(प्रतिनिधी)

वैकुंठवासी ह. भ. प. चैतन्य सद्गुरु तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा वारकरी पुरस्कार ह. भ. प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांना प्रदान करण्यात आला. यावर्षीचा हा 27 वा वारकरी पुरस्कार असून तो कार्तिक शुद्ध द्वादशी बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी वासकर वाडा, काळा मारुती मंदिरामागे, संत पेठ, पंढरपूर येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. विठ्ठल वासकर महाराज होते. 26 वा पुरस्कार देहू येथे गाथा मंदिर निर्माण करणारे ह. भ. प. पांडुरंग महाराज घुले यांना प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप शाल, हार, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व 21 हजाराचा श्रद्धानिधी असे आहे. श्री संत गोरोबाकाका व चैतन्य सद्गुरु तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र वाणेवाडी, तालुका जिल्हा धाराशिव तसेच श्री संत सेवा संघ, सातारा व श्री ज्ञानराज प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. चैतन्य सद्गुरु तात्यासाहेब बाबासाहेब वासकर यांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांच्या स्मरणार्थ 1998 पासून हा पुरस्कार ह. भ. प. विठ्ठल दादा वासकर महाराज यांच्या नियोजनातून सुरू करण्यात आला आहे. 1998 ला पहिला पुरस्कार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांना प्रदान करण्यात आला होता. तेव्हापासून त्याच तोलामोलाच्या व्यक्तिमत्वांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो आहे.

व्यासपीठावरील मान्यवर ह. भ. प. पांडुरंग महाराज घुले, ह. भ. प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. विठ्ठल महाराज वासकर यांच्या शुभहस्ते आबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘तुम्ही संत मायबाप कृपावंत’ या ईशस्तवनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत संयोजन समितीतील सदस्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेवनसिद्ध लामतुरे यांनी केले. नंतर संयोजन समितीच्या वतीने ह. भ. प. पांडुरंग महाराज घुले व कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. विठ्ठल वासकर महाराज यांच्या शुभहस्ते ह. भ. प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तत्पूर्वी त्यांना दिल्या जाणाऱ्या सन्मानपत्राचे वाचन ह. भ. प. प्रमोद महाराज जगताप यांनी केले.

पांडुरंगाच्या वतीने ह. भ. प. शंकर महाराज बडवे यांनी पांडुरंगाचे आशीर्वाद प्रदान केले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, महाराष्ट्र ही नररत्नांची खाण असल्यामुळे याहीपुढे पुरस्कार प्राप्त करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. समस्त वारकरी फडकरी यांच्या वतीने आशीर्वाद प्रदान करण्यासाठी ह. भ. प. प्रभाकर महाराज बोधले व विठ्ठलरुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त व वारकरी फडकरी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी आशीर्वाद प्रदान केले.

पुरस्काराला उत्तर देताना ह. भ. प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला. 207 वर्षांपासून वासकरांचा व देगलूरकर यांचा अव्याहत संबंध प्रस्थापित असून तेव्हापासून त्यांची कीर्तनसेवा आमच्या फडावर चालू असल्याचे सांगितले. आबांच्या आठवणींना उजाळा देत असताना समस्त वारकऱ्यांच्या बरोबरच विठ्ठल वासकर महाराज सुद्धा भावनिक झाले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमासाठी संयोजन समितीतील रेवणसिद्ध लामतुरे, पांडुरंग मन्मथ उंबरे, महादेव मारुती गाढवे, शेषराव नामदेव पौळ, रामचंद्र एकनाथआप्पा उंबरे, भागवत लिंबराज घेवारे, अक्षय चंद्रकांत भोसले, सोनोपंत घाडगे, प्रमोद महाराज जगताप, मदन विष्णुपंत कदम, श्रीपती चंद्रू माने, शशिकांत काटे, शिवाजी सुदाम सुळके, प्रवीण जयवंत शेलार, कृष्णा शिवराम खंडागळे, पंढरी रामचंद्र केसकर यांच्यासह चवरे महाराज, अंबऋषी देगलूरकर महाराज तसेच अनेक नामवंत महाराज मंडळी व वारकरी यांची उपस्थिती होती.

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!